धरिला पंढरीचा चोर

अभंग- संतवाणी-(आ) धरिला पंढरीचा चोर

◾ कवयित्री परिचय:-◾

संत जनाबाई

वारकरी संप्रदायातील लोकप्रिय संत कवयित्री. नामदेवांची पारमार्थिक शिष्या. संत नामदेवांच्या सान्निध्यात विठ्ठलभक्तीचा त्यांना ध्यास लागला.एक बंडखोर संत कवयित्री म्हणून जनाबाईंचा उल्लेख करायला हरकत नाही.प्राचीन साहित्यात स्त्रीवादाचा पुरस्कार केला आहे.

अभंगरचना-सकलसंतगाथा खंड पहिला:- संत जनाबाईंचे अभंग!! एकूण सुमारे ३५० अभंग या ग्रंथात मुद्रित आहेत.

भाषा- अभंगवाणीत वात्सल्य,कोमलता,सहनशीलता,विशुद्ध आत्मसमर्पण भावना व्यक्त करणारी भाषाशैली सुबोध,सरळ,साधी आहे.

जेष्ठ अभ्यासक रा.चिं. ढेरे म्हणतात,"तत्कालीन संत ज्ञानदेव,संत नामदेव,संत गोरा कुंभार आदी सत्पुरुषांच्या जीवनाचा आढावा घेणारी पद्यरचना करून संत जनाबाईंनी पुढील पिढ्यांवर एकप्रकारे उपकारच केले आहेत.

विशेष-हरिश्चंद्राख्यान नामक आख्यान रचना ही संत जनाबाईंच्या नावावर आहेत. त्यांच्या 'थाळीपाव व द्रौपदी स्वयंवर' या विषयावरील अभंगानी कवी मुक्तेश्वरांना स्फूर्ती मिळाली होती.

संत जनाबाईंच्या ओव्या महिलावर्गात अतिशय लोकप्रिय आहेत.

अभंग परिचय

अभंगरचनेतून विठ्ठलाला मायबाप प्रसंगी सखा,जीवाचा मैतर  समजणाऱ्या जनाबाईंनी विठ्ठलाशी साधलेला हा संवाद अतिशय हृद्य असा प्रेमळ सुखसंवाद आहे.

प्रस्तुत अभंगातून जनाबाईंची आर्त विठ्ठलभक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीची उच्चकोटींची पातळी दिसून येते. यामुळेच की काय विठ्ठलाशी ती हक्काने भांडणही करते.

अभंग स्पष्टीकरण

धरिला पंढरीचा चोर|
गळा बांधोनिया दोर||

वरील ओळींतून विठ्ठल दर्शनासाठी आसुसलेली जनाबाई दृष्टीस पडते. ती विठ्ठलाचे दर्शन झाल्याबरोबर  युक्तीने विठ्ठलाला बंदिस्त करते ते ही अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने!!

त्यासाठी ती विठ्ठलाला चोराचे रूपक योजते. भक्तीचा जणू काही अधिकारच गाजवून ती या पंढरपूरच्या पंढरीला चोर ठरवते आणि बंदिवान करते.(येथे चोर म्हणजे भक्तांच्या पापांचे हरण करणारा,भक्तांचे चित्त चोरणार असा चोर)

अशा या विठ्ठलाला नामस्मरण रुपी दोर बांधून जखडून ठेवले आहे.पंढरपूरच्या चोराला जखडून ठेवायचे असेल तर नामस्मरण हा अतिशय सोप्पा आणि प्रभावी असा दोरा आहे. इथे संत जनाबाई नाममहिमा वर्णन करतात.

हृदय बंदिखाना केला|
आत विठ्ठल कोंडिला||

जनाबाईंनी या विठ्ठलाला युक्तीने केवळ पकडलेच नाही तर स्वतःच्या हृदयाला बंदिशाला बनवून त्यात त्याला कोंडून ही ठेवले. तिच्या हृदयात सतत विठ्ठलाचे नामस्मरण रुपी वास्तव्य असल्याने तो तिथेच कोंडून ठेवण्यास योग्य!!

शब्दे केली जवाजुडी|
विठ्ठल पायीं घातली बेडी||

जनाबाईंनी या पंढरीच्या चोराला जखडून ठेवण्यासाठी शब्दरूपी बेडी तयार केली आणि ती त्याच्या पायात घातली आहे. शब्दरूपी अभंग आणि नामस्मरण या दोन बेडयांनी तिने विठ्ठलाला अगदी जखडून ठेवले आहे.

सोहं शब्दाचा मारा केला|
विठ्ठल काकुळतीला आला||

जनाबाईंनी विठ्ठलाला जखडून ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न करूनही शेवटी विठ्ठल निसटून जाण्यासाठी धडपडत आहे. अशावेळी जनाबाईंनी अध्यात्मिक मुक्तीमार्गाच्या शब्दांचा वापर केला.

असे म्हटले जाते की,जन्माला आल्यावर आपण "कोs हं"म्हणत जन्म घेतो. "मी कोण आहे" याचा शोधच इथून सुरू होतो आणि "सोs हं" पर्यंत हा शोध येऊन संपतो. "मी सर्वत्र व्यापलेला आहे", "सर्व विश्व माझ्यातच आहे". जीव आणि शिव एकच आहेत आणि ते शाश्वत सत्य आहे.

अशा सोsम शब्दांचा मारा विठ्ठलावर जनाबाईनी केला. तेव्हा मात्र विठ्ठल काकुळतीला आला आणि तिला शरण गेला.

जनाबाईंच्या मते,प्रत्येकाच्या शरीरात परमेश्वराचे वास्तव्य असते. त्याला शरीराबाहेर शोधण्यापेक्षा स्वतःमध्येच शोधून हृदयात कोंडून ठेवावा.

जनी म्हणे बा विठ्ठला|
जीवें न सोडी मी तुला||

जनाबाई अभंगाच्या शेवटी म्हणतात की,"तू माझ्यात आणि मी तुझ्यात (सोहं) व्यापलेले असल्यामुळे तुझी आता सुटका नाही.म्हणून हे बा विठ्ठला,मी माझ्या हृदयापासून ,माझ्या जीवपासून तुला कधीच दूर करणार नाही".

©मृणाल पाटोळे

धन्यवाद!!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Comments

  1. खूप छान आणि सोप्या भाषेत स्पटीकरण !👌

    ReplyDelete
  2. अतिशय सुंदर विवेचन केले आहे . धन्यवाद

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर विषय विवेचन मांडले.भक्तीभाव- अध्यात्म यांची छान सांगड घालून स्पष्टीकरण मांडले.

    ReplyDelete
  4. अतिशय सुंदर विवेचन

    ReplyDelete
  5. Thanks for sharing your explanation 🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जैसा वृक्ष नेणे

या झोपडीत माझ्या