जैसा वृक्ष नेणे

कविता-जैसा वृक्ष नेणे

कवी -  संत नामदेव महाराज 

▪रचनाप्रकार - अभंग

काव्यसंग्रह-सकलसंतगाथा खंड १

▪विषय▪

या अभंगात संत नामदेव महाराज यांनी संतांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये सांगितली आहेत.

▪व्यक्त होणारा स्थायीभाव▪

या अभंगामधून भक्तीरस व्यक्त होतो.
सुख दुःखे समे कृत्वा
लाभालाभौ जयाजयौ...

हा स्थायीभाव या अभंगामधून व्यक्त होतो.

▪कवीची लेखनवैशिष्ट्ये▪

संत नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायातील संतकवी.नामदेव हे ‘मराठीतील' पहिले चरित्रकार व आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.आयुष्यभर त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला.

आपल्या कीर्तनकलेमुळे प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावणारी अशी त्यांची कीर्ती होती. संत नामदेव प्रत्यक्ष श्रीविठ्ठलाच्या निकटवर्ती असलेला सखा होता, असे मानले जाते. संत नामदेव हे वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून भारतभर त्यांनी त्या बाबतीत भावनिक एकात्मता साधली. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्य त्यांनी आपल्या लिखाणातून केले.

सामान्य माणसाला समजेल , रूचेल अशा भाषेत उपमांचा वापर करून समाजाला योग्य वळण देण्याचे महत्वपूर्ण काम संत नामदेव महाराज यांनी आपल्या लिखाणामधून केले आहे.

संत नामदेवांची अभंगगाथा (सुमारे २५०० अभंग) प्रसिद्ध आहे. त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचना (सुमारे १२५ पदे) केली. त्यातील सुमारे बासष्ट अभंग (नामदेवजीकी मुखबानी) शीख पंथाच्या गुरुग्रंथ साहेबमध्ये गुरुमुखी लिपीत घेतलेले आहेत.

नामदेव महाराज बंडखोर वृत्तीचे होते.त्यांच्या रचनांमधून तसेच कृतीतूनही त्यांची बंडखोरी दिसून येते.त्यांनी वेद-विद्येचे पठण कधी केले नाही मात्र पीडितांची दुःखे जाणली.अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या जनतेला त्यापासून दूर करून त्यांना कर्मयोगाच्या मार्गाला लावले.

मोजक्या शब्दांत नामदेव महाराज यांनी मानवी मनाला उपदेश केला आहे.प्रस्तुत अभंगात दैनंदिन उदाहरणातून मानवी मनाचे कंगोरे स्पष्ट केले आहेत.

▪अभंगाची मध्यवर्ती कल्पना▪

प्रस्तुत अभंगात संतांच्या सहवासामुळे होणारा लाभ संत नामदेव महाराज यांनी सांगितला आहे.

अभंग स्पष्टीकरण▪

१.जैसा वृक्ष नेणे मान अपमान!
तैसे ते सज्जन वर्तताती!!१!!

प्रथम चरणामध्ये संत नामदेव असे म्हणतात की जसे वृक्ष मान- अपमान जाणत नाही,एकमेकांत भेद मानत नाहीत अशीच वागणूक,असेच वर्तन सज्जन माणसांचे असते,त्यांचा सर्वांप्रती एकसारखाच भाव असतो....

येऊनियां पूजा प्राणि जे करिती ।
त्याचें सुख चित्तीं तया नाहीं ॥२॥

जैसे वृक्ष त्यांची कोणी पूजा केली,त्यांना पाणी घातलं, कितीही त्यांची सेवा केली तरी त्याचा वृथा अभिमान ते बाळगत नाही,त्याचा त्यांना आनंद वाटत नाही.असे दुसऱ्या चरणात सांगितले आहे.

अथवा कोणी प्राणि येऊनि तोडितीl
तयाअ न म्हणती छेदूं नका ॥३॥

चंदनाचे झाड तोडणा-या कु-हाडीच्या पात्यालादेखील सुगंधच देते तसेच वागणे संतांचे असते.   हेच तिसऱ्या ओळीत संत नामदेव असे सांगतात . त्याच वृक्षाला कोणी येऊन इजा पोहचवत असेल,त्याला तोडत असेल,नुकसान करीत असेल तर त्याला सुद्धा तो रागवत नाही,तोडू नको असे म्हणत नाही.

निंदा स्तुति सम मानिती जे संत ।
पूर्णा धैर्यवन्त सिंधु ऐसे ॥४॥

वरील दोन ओळींचा संदर्भ घेऊन चौथ्या चरणात संत नामदेव महाराज असे म्हणतात की निंदा आणि स्तुती  संत सज्जन एकसमान मानतात,त्याचे आनंद किंवा दुःख करून घेत नाही, असा संयमाचा महासागर संत असतात. नाहीतर आपण सामान्य माणसं थोड्याच स्तुतीने आनंदाने नाचायला लागतो व थोड्याश्याच दुःखाने जणू सर्व जगाचे दुःख आपल्याच पदरी येऊन पडले असा रडत बसतो,आणि यातच संपूर्ण आयुष्य संपून जाते,परोपकार चांगली कर्म करायची राहून जातात.यामुळेच संतांचे अधिकार इतरांपेक्षा अधिक आहे यामुळेच शेवटच्या चरणात संत नामदेव म्हणतात .

नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी ।
तरी जीव शिवा मिठी पडुनि जाय ॥५॥

▪व्यक्त होणारा विचार▪

अश्या सज्जनांची,संतांची भेट जरी झाली,त्यांचे दर्शन जरी झाले तरी साक्षात ईश्वराचे दर्शन होते.
गरीब-श्रीमंत ,उच्च-नीच , स्पृश्यास्पृश्यता वगैरे भेदभाव न मानता आपल्या कृतीतून जगभर आनंद, प्रेम , समाधान आणि शांतता पसरवण्याचा संदेश संत नामदेव महाराज यांनी दिला आहे. 

 
▪मला आवडलेली ओळ आणि कारण▪

प्रस्तुत अभंगात वृक्ष आणि संतांची केलेली तुलना मला विशेष आवडली.
संतसंगती घडल्यास मानवी जीवन सुखकर होते मात्र योग्य संतांची ओळख सामान्य माणसाला झाली नाही तर स्वास्थ्य बिघडेल आणि म्हणूनच संत नामदेवांनी वृक्षाची उपमा सर्वार्थाने योग्य आहे.

▪न आवडलेली ओळ▪

न आवडलेली ओळ असूच शकत नाही या अभंगा मध्ये.

▪भाषिक सौंदर्य▪

या अभंगातील भाषा ही यमक जुळवणारी असून सोपी, रसाळ , ओघवती आणि उत्सुकता निर्माण करणारी आहे.अशा प्रकारचे साहित्य वाचल्याशिवाय  चैन पडणार नाही अशी वाचकांची अवस्था होते.

▪काव्यसौंदर्य▪

मनाला भावणारे ,  अबालवृद्ध सर्वांना पटणारे समजणारे..साध्या सोप्या शब्दांत जीवनविषयक तत्वज्ञान स्पष्ट करणारे हे काव्य आहे.

▪आशयसौंदर्य▪

मनात द्वंद्व निर्माण न होऊ देता सर्वांशी प्रेमाने वागा असा संदेश देणारा हा अभंग..खूप गहन अर्थ यातून स्पष्ट होतो.
वृक्ष ज्याप्रमाणे कसलाही भेदभाव करत नाहीत त्याचप्रमाणे संतांची वर्तणूक असते ..संतांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये यातून स्पष्ट होतात.अत्यंत मधाळ भाषा वापरल्याने यातील आशय वाचक आणि श्रोत्यांच्या अंतरंगाला भिडतो

©सविता कारंजकर

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#माझीशाळामाझीभाषा

Comments

  1. Why did you create this master piece?

    ReplyDelete
  2. छान माहिती दिलीत सर आभारी आहे.

    ReplyDelete
  3. Thanks jar mala yachi khup garaj hoti

    ReplyDelete
  4. कृपया या कवितेचा संदर्भ सांगा

    ReplyDelete
  5. Yachich garaj hoti mala thanks 😊

    ReplyDelete
  6. ☺👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌

    ReplyDelete
  7. 👍👍👍👍👍👍👍👍

    ReplyDelete
  8. 👍👍⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐⭐🧡🧡🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

धरिला पंढरीचा चोर

या झोपडीत माझ्या